इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या जागतिक विश्वात दबदबा असणाऱ्या एलॉन मस्क यांच्या टेस्लाने (Tesla) अखेर भारतीय लक्झरी बाजारातही आपली ताकद दाखवून दिली आहे. भारतात अधिकृत पाऊल ठेवल्याच्या अवघ्या एका वर्षाच्या आत कंपनीने देशात आपल्या Tesla Model Y या एकमेव मॉडेलच्या १,०१७ गाड्यांची यशस्वी डिलिव्हरी पूर्ण केली आहे. वाहन (Vahan) पोर्टलवरील अधिकृत नोंदणीच्या आकडेवारीनुसार, टेस्लासाठी नुकताच संपलेला सप्टेंबर हा भारतीय बाजारातील आजवरचा सर्वात विक्रमी महिना ठरला आहे.
या एकाच महिन्यात टेस्लाने २९१ इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री नोंदवली. विशेष बाब म्हणजे, या दमदार कामगिरीच्या जोरावर टेस्लाने भारतीय लक्झरी बाजारावर अनेक दशकांपासून राज्य करणाऱ्या मर्सिडीज-बेंझला (Mercedes-Benz) मागे टाकत लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
सप्टेंबरमध्ये ३२२ टक्क्यांची उसळी!
सप्टेंबर २०२५ मध्ये टेस्लाने अवघ्या ६९ गाड्या विकल्या होत्या. त्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ३२२ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर ऑगस्टच्या (११७ युनिट्स) तुलनेत मासिक विक्रीमध्येही १४९ टक्क्यांची मोठी झेप पाहायला मिळाली.
सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात विकल्या गेलेल्या ९७५ लक्झरी ईव्हींपैकी एकट्या BMW ने ५०२ गाड्यांची विक्री करत ५१.४८ टक्क्यांच्या वाट्यासह पहिला क्रमांक राखला. मात्र, टेस्लाने २९.८४ टक्के वाटा (२९१ युनिट्स) मिळवून मर्सिडीज-बेंझला (१२५ युनिट्स – १२.८२% वाटा) तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. लक्झरी वाहनांच्या विश्वात हा बदल अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक मानला जात आहे.
हेही वाचा सप्टेंबरमध्ये 180 किमी रेंज असलेली ही इलेक्ट्रिक बाइक ठरली नंबर-1!.
₹९ लाखांच्या किंमत कपातीचा गेमचेंजर निर्णय!
टेस्लाच्या विक्रीला अचानक इतका मोठा वेग कसा मिळाला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यामागे कंपनीने घेतलेला एक हुशारीचा व्यावसायिक निर्णय कारणीभूत ठरला आहे. मे महिन्यात टेस्लाने आपल्या ‘Model Y Premium RWD’ व्हेरिएंटच्या किमतीत ₹९ लाखांची मोठी कपात केली होती.
या कपातीमुळे या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ₹५०.८९ लाखांवर आली. या किमतीमुळे टेस्ला Hyundai Ioniq 5, Kia EV6 आणि BYD Sealion 7 सारख्या गाड्यांच्या किमतीच्या रेंजमध्ये आली. याचा जबरदस्त फायदा कंपनीला झाला; कारण जुलै ते २ ऑक्टोबर या अवघ्या तीन महिन्यांत ५५४ गाड्या रस्त्यावर उतरल्या. म्हणजेच टेस्लाने भारतात आतापर्यंत विकलेल्या एकूण गाड्यांपैकी निम्म्याहून अधिक गाड्या या किंमत कपातीनंतर विकल्या गेल्या आहेत.
५०० ते ६८१ किमीची रेंज आणि सुपरफास्ट परफॉर्मन्स
भारतात Tesla Model Y सध्या दोन प्रमुख पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:
Model Y Premium RWD (किंमत ₹५०.८९ लाख): यामध्ये ६४ kWh ची बॅटरी, २९९ हॉर्सपॉवरची पॉवर आणि ४२० Nm चा टॉर्क मिळतो. एका चार्जमध्ये ही कार ५०० किमीची (WLTP प्रमाणित) रेंज देते.
Model Y L Premium AWD (किंमत ₹६१.९९ लाख): यामध्ये ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम मिळते, जी एका चार्जमध्ये ६८१ किमीची रेंज गाठू शकते.
हेही वाचा: Ola-Uber Bike Taxi: महाराष्ट्रात 100% EV अनिवार्य; जुलै 2027 पर्यंत सर्व पेट्रोल गाड्या बंद?.
भारतात चार्जिंग नेटवर्क आणि शोरूम्सचा झपाट्याने विस्तार
केवळ कार विकून टेस्ला थांबलेली नाही, तर भारतीय ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी विक्रीपश्चात सेवा आणि चार्जिंगचे जाळेही वेगाने बनवले जात आहे. नुकतेच टेस्लाने चेन्नईमध्ये आपले सहावे भव्य ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू केले असून, मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये आधीच केंद्रे कार्यरत आहेत.
चार्जिंगच्या बाबतीत कंपनीकडे सध्या देशात ७ मुख्य चार्जिंग स्टेशन्स, २० हाय-स्पीड सुपरचार्जर्स (Superchargers) आणि २४ डेस्टिनेशन चार्जर्स कार्यरत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, दिल्ली-जयपूर हायवे यांसारख्या प्रमुख मार्गांवरही टेस्लाने चार्जिंग सुविधा सक्षम केली आहे.
लक्झरीत बाजी मारली, पण संपूर्ण ईव्ही बाजारात मोठा पल्ला बाकी!
लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात टेस्लाने मर्सिडीजला मागे टाकून भलेही इतिहास रचला असला, तरी संपूर्ण भारतीय ईव्ही बाजाराचा विचार केला तर टेस्लाचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात देशात विकल्या गेलेल्या एकूण ३५,९९५ इलेक्ट्रिक प्रवासी कार्समध्ये टेस्लाचा वाटा केवळ ०.८ टक्क्यांच्या आसपास होता.
कारण टाटा, महिंद्रा आणि एमजीसारखे ब्रँड्स १५ ते २५ लाखांच्या बजेट गाड्यांवर राज्य करत आहेत. मात्र ₹५० लाखांच्या वरच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये मस्क यांच्या ब्रँडने प्रस्थापित युरोपियन कंपन्यांची झोप उडवली आहे, यात तीळमात्र शंका नाही.

