पुण्यात आजपासून EV चा सर्वात मोठा मेळावा! 150 हून अधिक कंपन्यांची हजेरी; पाहा काय असणार खास?

Pune EV Expo 2026 (प्रातिनिधिक फोटो)

Pune Ev Expo 2026: ऑटोमोबाइलची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात आजपासून इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि हरित ऊर्जा (Clean Energy) क्षेत्रातील एका भव्य प्रदर्शनाला सुरुवात होत आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो २०२६’ (India International EV Show 2026) या तीन दिवसीय महाप्रदर्शनाचे आयोजन २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध ‘ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर’ (Auto Cluster Exhibition Centre) येथे करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, यंदा ईव्ही शोसोबतच ‘बॅटरी शो’ (Battery Show) आणि ‘सोलर शो’ (Solar Show) देखील एकाच छताखाली भरवण्यात आले आहेत. आयोजक ‘फ्युचरेक्स ट्रेड फेअर अँड इव्हेंट्स’ (Futurex Trade Fair & Events) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात देशभरातून १५० हून अधिक आघाडीच्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

एकाच ठिकाणी ईव्ही, बॅटरी आणि सौर ऊर्जेचा संगम

इलेक्ट्रिक वाहनांचे भविष्य त्यासाठी लागणारी ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. याच उद्देशाने या प्रदर्शनात संपूर्ण इकोसिस्टम पाहायला मिळणार आहे:

  • नवीन इलेक्ट्रिक वाहने: आधुनिक इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, ई-कार्स, कमर्शियल व्हेईकल्स आणि ई-बसेस प्रदर्शनात असतील.
  • ईव्ही स्पेअर पार्ट्स: वाहनांचे अत्याधुनिक सुटे भाग आणि प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान देखील पाहायला मिळेल.

हेही वाचा: फक्त एका रुपयात 4 किमी धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री दुपटीने वाढली; जाणून घ्या किंमत आणि रेंज.

बॅटरी तंत्रज्ञान आणि फास्ट चार्जिंग सोल्यूशन्स

ईव्ही खरेदी करताना ग्राहकांच्या मनात बॅटरी आणि चार्जिंगबाबत अनेक प्रश्न असतात. या प्रदर्शनात बॅटरी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान जवळून पाहता येईल:

  • बॅटरी पॅक्स आणि बीएमएस (BMS): प्रगत लिथियम बॅटरी सेल्स आणि सुरक्षिततेसाठीचे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम्स.
  • स्मार्ट चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग: अवघ्या काही मिनिटांत बॅटरी बदलून देणारे स्वॅपिंग स्टेशन्स आणि हाय-स्पीड चार्जर इन्फ्रास्ट्रक्चर.
  • बॅटरी रिसायकलिंग: वापरलेल्या बॅटरीचे पर्यावरणपूरक पुनर्चक्रीकरण (Recycling) कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक.

सौर ऊर्जेवर चालणारी चार्जिंग स्टेशन्स ठरणार मुख्य आकर्षण

प्रदर्शनात एकाच वेळी सुरू असलेल्या ‘इंडिया सोलर शो’ मुळे वाहने थेट सौर ऊर्जेवर कशी चार्ज करता येतील, यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये सोलर पीव्ही पॅनेल्स, स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान, क्लाउड-कनेक्टेड आयओटी (IoT) आणि एआय (AI) सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चार्जिंग अधिक किफायतशीर कशी करता येईल, याचे सादरीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा: TATA च्या सर्व इलेक्ट्रिक कार झाल्या स्वस्त! अवघ्या ₹4.69 लाखांत खरेदीची संधी; पाहा काय आहे नवीन BaaS मॉडेल?.

प्रदर्शन नेमक कुणासाठी?

हे प्रदर्शन केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित नसून सर्वांसाठी खुले आहे:

  • ईव्ही उत्पादक, डीलर्स, डिस्ट्रिब्युटर्स आणि सुटे भाग पुरवठादार.
  • सरकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स.
  • ग्राहक आणि विद्यार्थी: नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करणारे ग्राहक तसेच ऑटोमोबाइल व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यांच्यासाठी प्रत्यक्ष तंत्रज्ञान अनुभवण्याची ही उत्तम संधी आहे.

प्रदर्शन पुण्यातच का?

पुणे हे देशातील अग्रगण्य ऑटोमोबाइल आणि इंजिनिअरिंग हब मानले जाते. पिंपरी-चिंचवड आणि चाकण पट्ट्यात नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या, संशोधन केंद्रे आणि अनेक ईव्ही स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्यामुळे या भव्य प्रदर्शनाची आठवी आवृत्ती पुण्यात होणे हे महाराष्ट्रातील ईव्ही क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि दिशादर्शक ठरणार आहे.

Share This Article