TVS iQube vs Bajaj Chetak: पेट्रोलचा वाढता खर्च टाळण्यासाठी आज प्रत्येक घरात इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार सुरू आहे. त्यातही जेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी एकच दणकट गाडी निवडायची असते, तेव्हा मनात दोनच नावे सगळ्यात आधी येतात—टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गाड्यांमध्ये बरेच नवीन बदल केले आहेत. टीव्हीएसने आपल्या iQube मध्ये बॅटरीचे अनेक पर्याय देत रेंजचा मोठा पल्ला गाठला आहे, तर बजाजने आता Chetak C25, C30 आणि C35 अशी नवी सिरीज बाजारात आणली आहे. अशा वेळी नेमकी कोणती गाडी तुमच्या बजेटला परवडेल ते जाणून घेऊयात.
- TVS iQube vs Bajaj Chetak: एका चार्जमध्ये कोण धावणार जास्त? (बॅटरी आणि रेंजची तुलना)
- TVS iQube vs Bajaj Chetak: चार्जिंगसाठी किती वेळ लागतो?
- मेटल बॉडी की फॅमिली कम्फर्ट? (डिझाइन आणि स्टोरेज स्पेस)
- स्क्रीन आणि स्मार्ट फीचर्स
- TVS iQube vs Bajaj Chetak यांच्या किमतीत किती फरक आहे?
- मग तुमच्यासाठी कोणती स्कूटर योग्य ठरेल?
TVS iQube vs Bajaj Chetak: एका चार्जमध्ये कोण धावणार जास्त? (बॅटरी आणि रेंजची तुलना)
गाडी घेताना प्रत्येकाचा पहिला प्रश्न असतो, एका चार्जमध्ये किती धावणार? टीव्हीएस आयक्यूबच्या बाबतीत बोलायच झाल तर कंपनीने २.३ kWh पासून थेट ५.३ kWh पर्यंतचे पर्याय दिले आहेत. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल तर ११४ किमीची प्रमाणित रेंज देणारे बेस मॉडेल निवडू शकता, आणि रोजचा प्रवास जास्त असेल तर २१२ किमी आयडीसी रेंज देणारे टॉप-एंड ‘iQube ST’ आहेच.
दुसरीकडे बजाज चेतकने रोजच्या प्रवाशांची गरज ओळखून तीन पर्याय समोर ठेवले आहेत. रोजच्या स्थानिक वापरासाठी असलेली C25 ही २.५ kWh बॅटरीसह ११३ किमीची रेंज देते, तर ३.२ kWh बॅटरीची ३५ सिरीज १५३ किमीपर्यंत धावू शकते.
TVS iQube vs Bajaj Chetak: चार्जिंगसाठी किती वेळ लागतो?
गाडीची बॅटरी चार्ज व्हायला किती वेळ लागतो, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चेतकच्या ३५ सिरीजची बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी घरगुती सॉकेटवर साधारण तीन तास घेते. आयक्यूबच्या बाबतीत हा वेळ तुमच्या बॅटरीच्या आकारावर ठरतो. लहान २.३ kWh ची बॅटरी पावणेतीन तासांत 80 टक्क्यांपर्यंत भरते, तर ५.३ kWh ची बॅटरी चार्ज होण्यासाठी सव्वाचार तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
मेटल बॉडी की फॅमिली कम्फर्ट? (डिझाइन आणि स्टोरेज स्पेस)
डिझाइन आणि मजबुतीचा विचार केला तर चेतकचा थाट वेगळाच आहे. आजही बजाज चेतक आपल्या अस्सल मेटल बॉडीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. गाडी चालवताना मिळणारा भारदस्तपणा आणि पडझडीत ईतर गाड्यांच्या तुलनेत होणारे कमी नुकसान यामुळे चेतक विश्वासार्ह वाटते. त्यात नव्या ३५ सिरीजमध्ये सीटखाली मोठी जागा दिल्याने रोजचा भाजीपाला किंवा सामानाची पिशवी सहज बसते.
याउलट टीव्हीएस आयक्यूब दिसायला स्टायलिश आहे. गाडी वजनाने हलकी वाटते, महिलांना किंवा घरातील ज्येष्ठ सदस्यांना चालवायला अत्यंत सोपी जाते, आणि तिचा पाय ठेवायचा भाग पूर्ण सपाट असल्याने सिलिंडर किंवा सामान ठेवणे शक्य होते.
स्क्रीन आणि स्मार्ट फीचर्स
स्क्रीन आणि आधुनिक फीचर्समध्ये दोन्ही गाड्या एकमेकांना जोरदार टक्कर देतात. टीव्हीएस आयक्यूबमध्ये तब्बल ११८ हून अधिक कनेक्टेड फीचर्स मिळतात. मोठ्या व्हेरियंट्समध्ये मिळणारी टीएफटी टचस्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, आणि गर्दीच्या ठिकाणी पार्किंगसाठी उपयोगी पडणारा रिव्हर्स मोड रोजच्या ड्रायव्हिंगचा ताण खूप कमी करतो.
बजाजनेही आपल्या नव्या C-सिरीजमध्ये, विशेषतः C35 01 मध्ये गुगल मॅप्सचे इंटिग्रेशन दिले आहे. याशिवाय ८० किमी प्रतितासचा टॉप स्पीड, राईड मोड्स आणि चढावर गाडी मागे येऊ नये म्हणून हिल-होल्ड असिस्टसारखे उपयुक्त फीचर्स दिले आहेत.
TVS iQube vs Bajaj Chetak यांच्या किमतीत किती फरक आहे?
किमतीचा विचार केला तर सुरुवातीच्या किमतींमध्ये फार मोठे अंतर नाही. टीव्हीएस आयक्यूबची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹९५,१२४ पासून सुरू होते, तर बजाजने आपल्या Chetak C25 ला जवळपास ₹९१,३९९ च्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करून थेट स्पर्धा निर्माण केली आहे. मात्र व्हेरियंट, बॅटरी क्षमता आणि सरकारी योजनांनुसार ऑन-रोड किमतीत थोडी तफावत असू शकते.
हेही वाचा: फक्त एका रुपयात 4 किमी धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री दुपटीने वाढली; जाणून घ्या किंमत आणि रेंज.
मग तुमच्यासाठी कोणती स्कूटर योग्य ठरेल?
जर तुमच्या गरजांमध्ये हलके वजन, कुटुंबातील प्रत्येकाला चालवता येईल असा कम्फर्ट, ११० ते २१० किमी दरम्यान बॅटरी निवडण्याचे स्वातंत्र्य आणि प्रगत टचस्क्रीन टेक्नॉलॉजी या गोष्टी महत्त्वाच्या असतील, तर टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) हा पर्याय अत्यंत व्यवहार्य ठरतो.
जर तुम्हाला जुन्या चेतकसारखा सॉलिड मेटल लूक असलेली मजबूत गाडी हवी असेल तर बजाज चेतक (Bajaj Chetak) ही तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. खरेदीचा निर्णय घेण्याआधी जवळच्या शोरूममध्ये जाऊन दोन्ही गाड्यांची टेस्ट राइड नक्की घेऊन बघा.
हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये 715 किमी धावणार! Mercedes ची हाय-स्पीड लक्झरी EV पुण्यात होणार तयार; 4 नोव्हेंबरला एन्ट्री.

