भारतीय एसयूव्ही बाजारात आपल्या दमदार डिझाइन आणि ताकदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महिंद्राने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या विश्वातही आपला झेंडा रोवला आहे. कंपनीच्या पूर्णपणे नव्या ‘इलेक्ट्रिक ओरिजिन’ (Electric Origin) श्रेणितील BE 6, XEV 9e आणि 3-रो XEV 9S या लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांनी तब्बल १ लाख युनिट्स बिलिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. महिंद्राने सप्टेंबरच्या अधिकृत विक्री अहवालात ही माहिती जाहीर केली असून, अवघ्या काही महिन्यांत गाठलेला हा टप्पा देशातील ईव्ही क्षेत्रासाठी अत्यंत मोठा मानला जात आहे.
या धमाकेदार कामगिरीनंतर महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या या इलेक्ट्रिक प्रवासाचा वेग इतका जबरदस्त आहे की, हा १ लाखांचा टप्पा साजरा करण्यासाठी थांबण्याऐवजी कंपनी पुढील मोठ्या लक्ष्याकडे अधिक वेगाने धावत आहे.
हेही वाचा: इलेक्ट्रिक वाहनांवर बंपर सवलतींची सरकारची घोषणा! कर्जावर सूट आणि 900 चार्जिंग स्टेशन; पाहा संपूर्ण प्लॅन.
पहिल्याच दिवशी रचला होता ₹8,400 कोटींचा इतिहास!
महिंद्राच्या या नव्या इलेक्ट्रिक क्रांतीची सुरुवात नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती, जेव्हा कंपनीने बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित BE 6 आणि कूपे स्टाईलची XEV 9e बाजारात आणली. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये जेव्हा या गाड्यांचे अधिकृत बुकिंग सुरु झाली, तेव्हा भारतीय ग्राहकांनी पहिल्या २४ तासांतच ३०,१७९ गाड्यांचे बुकिंग केले होते, ज्याची एकूण एक्स-शोरूम किंमत तब्बल ₹८,४७२ कोटींपेक्षा जास्त होती.
यामध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, भारतीय ग्राहक आता केवळ स्वस्त ईव्हीच्या मागे न धावता प्रीमियम दर्जा, उत्तम रेंज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी पैसे मोजायला तयार आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या एकूण बुकिंगपैकी तब्बल ७३ टक्के लोकांनी ७९ kWh ची मोठी बॅटरी असलेला टॉप-स्पेक ‘Pack Three’ व्हेरिएंट निवडला होता. तर एकूण मागणीत XEV 9e चा वाटा ५६ टक्के आणि स्पोर्टी BE 6 चा वाटा ४४ टक्के होता.
फॅमिलीसाठी आलेल्या XEV 9S ने मारली बाजी
दोन रो (५-सीटर) मॉडेल्सच्या यशानंतर महिंद्राने भारतीय मोठ्या कुटुंबांची गरज ओळखून XEV 9S ही तीन रांगांची आलिशान इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात उतरवली. जानेवारी २०२६ मध्ये बुकिंग सुरू होताच या गाडीला प्रचंड मागणी आली. कंपनीच्या माहितीनुसार, XEV 9S आणि पेट्रोल-डिझेलवरील 7XO मिळून अल्पावधीतच ९३ हजारांपेक्षा जास्त बुकिंगचा टप्पा गाठला गेला.
त्यानंतर नुकत्याच सादर करण्यात आलेल्या BE 6 SPORTEQ या परफॉर्मन्स व्हेरियंटने तरुणाईला आकर्षित केले, ज्यामुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओला बाजारात कायम आघाडीवर राहण्यास मोठी मदत झाली.
सप्टेंबरमध्ये एकूण विक्रीतही १५ टक्क्यांची उसळी
इलेक्ट्रिक वाहनांच्या या विक्रमी कामगिरीचा सकारात्मक परिणाम महिंद्राच्या एकूण मासिक विक्रीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून एकूण १,१४,८७४ वाहनांची विक्री नोंदवली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी जास्त आहे. केवळ देशांतर्गत एसयूव्ही सेगमेंटचा विचार केला तरी ६४,०९२ वाहने विकली गेली असून त्यात १४ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे.
हा टप्पा भारतीय ईव्ही बाजारासाठी का महत्त्वाचा आहे?
मार्च २०२५ पासून प्रत्यक्ष ग्राहकांना या गाड्यांची डिलिव्हरी देण्यास सुरुवात झाली होती. म्हणजेच अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत १ लाख युनिट्स बिलिंगचा पल्ला गाठणे, हे महिंद्राच्या उत्पादन क्षमतेवर आणि भारतीय ग्राहकांच्या Ev च्या विश्वासावर शिक्कामोर्तब करते.
(इथे ग्राहकांनी एक तांत्रिक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की, १ लाखांचा हा आकडा कंपनीकडून डीलर्सना झालेल्या एकत्रित बिलिंगचा आहे. यात थेट आरटीओ रजिस्ट्रेशन किंवा रिटेल डिलिव्हरीचा वेगळा तपशील समाविष्ट नाही.)
एकेकाळी भारतात टाटा मोटर्सचा ईव्ही बाजारात दबदबा होता. मात्र महिंद्राने आपल्या जागतिक दर्जाच्या लूक, फ्यूचरिस्टिक डॅशबोर्ड स्क्रीन्स, प्रगत बॅटरी पॅक आणि रस्त्यावर दरारा निर्माण करणाऱ्या मॉडेल्सच्या जोरावर प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. १ लाखांचा हा टप्पा केवळ एका कंपनीचा विजय नसून, भारतीय ग्राहक आता आत्मविश्वासाने हाय-एंड इलेक्ट्रिक गाड्यांचा स्वीकार करत असल्याचे हे संकेत आहेत.

