MG Hector Tomahawk EV vs Tata Harrier EV: 7-सीटर लक्झरी की 627 किमी रेंज? पाहा कोणाचा वरचष्मा!

MG Hector Tomahawk EV आणि Tata Harrier.ev ची तुलना (प्रातिनिधिक फोटो)

MG Hector Tomahawk EV Vs Tata Harrier Ev: भारतीय रस्त्यांवर आता मोठ्या आणि आलिशान एसयूव्हीची क्रेझ झपाट्याने वाढते आहे. त्यातही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सध्या दोन दमदार गाड्यांची जोरदार चर्चा रंगली आहे—एक म्हणजे नुकतीच समोर आलेली MG Hector Tomahawk EV आणि दुसरी देशातील सर्वात लोकप्रिय व भरवशाची Tata Harrier.ev. या दोन्ही गाड्या दिसायला भारदस्त, लक्झरी आणि लांबच्या प्रवासासाठी सज्ज आहेत. मात्र, त्यांच्या किमतीत, सीटिंग क्षमतेत, बॅटरीच्या पर्यायांमध्ये आणि रस्त्यावरील ताकदीत मोठे फरक आहेत. जर तुम्ही २० ते २५ लाखांच्या बजेटमध्ये एक मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधत असाल, तर या दोघांमधील नेमका फरक समजून घेणे गरजेचे आहे.

MG Hector Tomahawk EV Vs Tata Harrier Ev किंमत

सगळ्यात आधी चर्चा होते ती बजेटची. एमजीने इथे पुन्हा एकदा आपले लोकप्रिय ‘Battery-as-a-Service’ (BaaS) कार्ड खेळले आहे. जर तुम्ही बॅटरी रेंटवर घेण्याचा पर्याय निवडला, तर MG Hector Tomahawk EV अवघ्या ₹१३.९९ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत घेता येते; यासाठी तुम्हाला प्रति किमी ₹४.९० बॅटरीचे भाडे द्यावे लागेल. जर बॅटरीसह गाडी खरेदी करायची असेल, तर तिची एक्स-शोरूम किंमत ₹१९.४९ लाखांपासून सुरू होते.

दुसरीकडे, टाटा मोटर्सने Harrier.ev ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹२१.४९ लाख ठेवली आहे, तर तिच्या मोठ्या ७५ kWh व्हेरियंट्सची किंमत ₹२४.९९ लाखांपासून तर टॉप व्हेरियंट ₹२८.९९ लाखांपर्यंत जाते. म्हणजेच सुरुवातीच्या खरेदी खर्चाचा विचार केला तर एमजी हेक्टर थेट २ लाख रुपयांनी स्वस्त पडते.

सीटिंग आणि जागा: ५ सीटर की ७ सीटर?

गाडीचा आकार आणि आतील जागेच्या बाबतीत एमजीने भारतीय मोठ्या कुटुंबांची नस पकडली आहे. हेक्टर टॉमहॉकची लांबी ४,७४५ मिमी आणि व्हीलबेस २,८१० मिमी आहे. यात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही गाडी ५-सीटर सोबतच ७-सीटर कॉन्फिगरेशनमध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात ६ ते ७ सदस्य आहेत, त्यांच्यासाठी हा अत्यंत मोठा प्लस पॉईंट ठरतो.

याउलट टाटा हॅरियर ईव्ही ही ४,६०७ मिमी लांबीची अस्सल ५-सीटर एसयूव्ही आहे. यात तिसरी रो नसली तरी पाच प्रवाशांसाठी मिळणारी लेगरूम, प्रशस्त हेडरूम आणि डिकीत सामान ठेवण्यासाठी मोठी जागा लांबच्या टूरिंगसाठी अत्यंत आरामदायी वाटते.

MG Hector Tomahawk EV vs Tata Harrier EV : बॅटरी आणि रेंज

लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार केला तर टाटा हॅरियर ईव्ही स्पष्टपणे पुढे निघून जाते. टाटाने यामध्ये ६५ kWh आणि ७५ kWh अशा दोन मोठ्या बॅटरीचे पर्याय दिले आहेत. ६५ kWh चे रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) मॉडेल ५३८ किमी धावते, तर ७५ kWh चे RWD मॉडेल ६२७ किमीची प्रमाणित रेंज देते.

दुसरीकडे, MG Hector Tomahawk EV मध्ये ६९.२ kWh चा एलएफपी (LFP) बॅटरी पॅक मिळतो, जो एका चार्जमध्ये ५१७ किमीपर्यंतची प्रमाणित रेंज देतो. प्रत्यक्ष रस्त्यावर ट्रॅफिक आणि एसीसह पाहिले तर दोन्ही गाड्या ४०० ते ५०० किमीचा टप्पा सहज पार करू शकतात, मात्र महामार्गावरील खात्रीशीर जास्त रेंजसाठी हॅरियरचा ७५ kWh बॅटरी पॅक वरचढ ठरतो.

फास्ट चार्जिंगच्या बाबतीतही हॅरियर ईव्ही १२० kW पर्यंतच्या डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे तिची बॅटरी अवघ्या २५ मिनिटांत २० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते, तर हेक्टर ९० kW पर्यंतच्या डीसी चार्जिंगला सपोर्ट करते.

ताकद आणि स्पीड

जर तुम्हाला पिकअप आणि ऑफ-रोडिंगची आवड असेल, तर हॅरियर ईव्ही एक वेगळाच थरार देते. हॅरियरच्या ऑल-व्हील ड्राइव्ह (QWD) मॉडेलमध्ये दोन मोटर्स मिळून तब्बल ३९६ पीएसची पॉवर आणि ५०४ न्यूटन मीटरचा टॉर्क तयार करतात. ही गाडी अवघ्या ६.३ सेकंदात ताशी ० ते १०० चा वेग पकडते.

याउलट एमजी हेक्टर टॉमहॉक ही अधिक कौटुंबिक आणि शांत प्रवासासाठी ट्यून केलेली वाटते. तिच्यातील मोटर १५० kW (सुमारे २०४ PS) पॉवर आणि ३१० Nm टॉर्क देते, ज्यामुळे ती ० ते १०० चा वेग गाठण्यासाठी ८.२ सेकंद घेते.

हेही वाचा: हिवाळ्यात तुमची इलेक्ट्रिक कार कमी रेंज देतेय? बॅटरी आणि मायलेज टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स!.

हाय-टेक फीचर्स आणि घरातील विजेची सोय (V2H)

केबिनच्या आत दोन्ही गाड्या भविष्यातील तंत्रज्ञानाने खच्चून भरलेल्या आहेत. एमजी हेक्टरमध्ये डॅशबोर्डवर १५.६ इंचाचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, पॅनोरमिक स्काय-रूफ आणि २५६ रंगांची ॲम्बियंट लायटिंग मिळते. यात सर्वात भारी फिचर म्हणजे ‘Vehicle-to-Home’ (V2H)—म्हणजेच घरात लाईट गेली तर तुम्ही गाडीच्या बॅटरीचा वापर करून घरातील पंखे, टीव्ही आणि इतर उपकरणे चालवू शकता!

टाटा हॅरियरमध्येही जेबीएलची (JBL) सराउंड ऑडिओ सिस्टीम, व्हेंटिलेटेड सीट्स, ३६०-डिग्री कॅमेरा, ऑटो पार्किंग आणि चिखलातून किंवा खडतर रस्त्यावरून गाडी काढण्यासाठी टेरेन रिस्पॉन्स मोड्स मिळतात.

सुरक्षेच्या बाबतीत टाटा हॅरियर ईव्हीने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळवून स्वतःला सिद्ध केल आहे, तर हेक्टरमध्ये ६ एअरबॅग्ज आणि लेव्हल-२ एडॉस (ADAS) सारखे आधुनिक फीचर्स असले तरी तिचे अधिकृत क्रॅश टेस्ट रेटिंग अजून समोर यायचे आहे.

मग तुमच्यासाठी कोणती SUV ठरेल सर्वोत्तम?

दोन्ही गाड्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजा अचूक पूर्ण करतात:

जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तुम्हाला ७-सीटर गाडीची गरज असेल, बजेट २० लाखांच्या आत मर्यादित ठेवायचे असेल (किंवा BaaS मॉडेलचा फायदा घ्यायचा असेल) आणि घरात वीज पुरवणारे आधुनिक V2H फिचर हवे असेल, तर MG Hector Tomahawk EV हा तुमच्यासाठी अधिक सोयीचा आणि पैशांची बचत करणारा पर्याय ठरेल.

पण जर तुमचे प्राधान्य ६०० किमीपेक्षा जास्त रेंज, ५-स्टार सेफ्टी, ४x४ (QWD) ची ताकद आणि अवघ्या २५ मिनिटांचे सुपरफास्ट चार्जिंग हे असेल, तर Tata Harrier.ev ही एक परिपूर्ण आणि आधुनिक प्रीमियम ई-एसयूव्ही ठरते.

Share This Article