Mercedes Glc Electric Launch Date India: भारतीय लक्झरी कार बाजारात सध्या मर्सिडीज-बेंझचा मोठा दबदबा आहे, आणि आता कंपनी आपल्या सर्वात लोकप्रिय SUV चे संपूर्ण इलेक्ट्रिक रूप भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. मर्सिडीजची बहुप्रतिक्षित GLC Electric येत्या 4 नोव्हेंबर 2026 रोजी अधिकृतपणे भारतात दाखल होत आहे. यात आपल्यासाठी सर्वात अभिमानाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लक्झरी कार थेट बाहेरून आयात करण्याऐवजी पुण्याच्या चाकण प्लांटमध्येच असेंबल केली जाणार आहे.
सुरुवातीला कंपनी ही SUV GLC 400 4MATIC या व्हेरियंटमध्ये आणत असून, ऑक्टोबर महिन्यापासूनच तिचे बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
Mercedes Glc Electric : रेंज आणि परफॉर्मन्समध्ये प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर
एखाद्या लक्झरी ईव्हीमध्ये ग्राहक सर्वात आधी काय पाहतात? तर तिचा वेग आणि बॅटरीची रेंज! मर्सिडीजने या दोन्ही आघाड्यांवर कोणतीही कसर सोडलेली नाही. या गाडीमध्ये ९४ किलोवॅट तासांची (kWh) बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत WLTP चाचणीनुसार, ही कार एका चार्जमध्ये ७१५ किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. भारतीय रस्त्यांवर आणि ट्रॅफिकमध्ये यात थोडा फरक पडला, तरीही ५०० ते ६०० किमीचा पल्ला ही सहज गाठू शकते.
वेगाच्या बाबतीत बोलायच झाल तर, यात दिलेल्या दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळून जवळपास ४८९ बीएचपीची ताकद आणि ८०० न्यूटन मीटरचा टॉर्क तयार करतात. याचा परिणाम असा होतो की, इतकी मोठी आणि जड लक्झरी SUV असूनही ताशी ० ते १०० चा वेग अवघ्या ४.३ सेकंदात पकडते. पायाखाली एक्सलेटर दाबताच गाडी एखाद्या स्पोर्ट्स कारसारखी पुढे झेपावते, गाडीचा टॉप स्पीड २१० किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे.
१० मिनिटांत ३०० किमी धावण्याची ताकद!
ईव्ही खरेदी करताना चार्जिंगचा वेळ हा अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. मात्र GLC Electric ही प्रगत ८०० व्होल्टच्या तंत्रज्ञानावर तयार करण्यात आल्यामुळे ती ३३० किलोवॅटपर्यंतच्या सुपरफास्ट डीसी चार्जिंगला सपोर्ट करते. जर तुम्हाला असा हाय-स्पीड चार्जर मिळाला, तर अवघ्या २२ मिनिटांत तिची बॅटरी १० वरून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. अगदी महामार्गावर चहा-पाण्यासाठी १० मिनिटे थांबलात, तरी जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास सहज करता येईल इतकी ती चार्ज होते.
हेही वाचा: TATA च्या सर्व इलेक्ट्रिक कार झाल्या स्वस्त! अवघ्या ₹4.69 लाखांत खरेदीची संधी; पाहा काय आहे नवीन BaaS मॉडेल?.
बाहेरून राजेशाही, आतून भविष्यातील तंत्रज्ञान
गाडीच्या लुकबद्दल बोलायचे तर, समोरच्या बाजूला मर्सिडीजचा चमकणारा मोठा लोगो, आकर्षक इल्युमिनेटेड ग्रिल आणि स्टार-पॅटर्नच्या एलईडी लाइट्स तिला रस्त्यावर एक वेगळाच रुबाब देतात. जवळपास ४.८ मीटर लांब आणि २,९७२ मिमीचा व्हीलबेस असल्यामुळे आतमध्ये बसणाऱ्यांसाठी पायाला मोकळी जागा आणि भरपूर कम्फर्ट मिळतो.
पण खरी जादू सुरू होते ती गाडीच्या आत पाऊल ठेवल्यावर! डॅशबोर्डवर थेट ३९.१ इंचाची सलग ‘MBUX हायपरस्क्रीन’ पसरलेली आहे. काचेच्या एकाच फ्रेममध्ये ड्रायव्हरचा डिस्प्ले, मधली इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि बाजूच्या प्रवाशाची स्क्रीन अशा तिन्ही स्क्रीन्स एकत्र जोडल्या आहेत. सर्व सिस्टिम आधुनिक एआय तंत्रज्ञानावर काम करते. फॅमिली ट्रिपसाठी मागे ५७० लिटरची मोठी डिकी मिळते.
Mercedes Glc Electric ची किंमत किती असणार?
पुण्यातील चाकणमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल होत असल्यामुळे या कारवर लागणारा भरमसाठ आयात कर वाचणार आहे. त्यामुळे बाजारातील जाणकारांच्या अंदाजानुसार, मर्सिडीज ही गाडी ₹८० लाख ते ₹९० लाखांच्या (एक्स-शोरूम) आसपासच्या किमतीत उतरवू शकते. अंतिम किंमत ४ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
हेही वाचा: पुण्यात आजपासून EV चा सर्वात मोठा मेळावा! 150 हून अधिक कंपन्यांची हजेरी; पाहा काय असणार खास?.

