Electric Car Sales: भारतात ई-कार्सची रेकॉर्डब्रेक विक्री! प्रत्येक 12 पैकी 1 कार EV; Tata आणि Mahindra चा बाजारात धुमाकूळ

भारतात इलेक्ट्रिक कारच्या नोंदणीत 94% वाढ; Tata Nexon.ev आणि Mahindra BE 6 (प्रातिनिधिक फोटो)

Electric Car Sales in India: भारतीय रस्त्यांवर आता पेट्रोल आणि डिझेलच्या आवाजाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांची शांतता अधिक वेगाने पसरताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यातील वाहन नोंदणीच्या (Vahan Portal) अधिकृत आकडेवारीने संपूर्ण देशांतर्गत ऑटो बाजाराला चकित केले आहे. या एकाच महिन्यात देशभरात तब्बल ३५,९४८ इलेक्ट्रिक प्रवासी गाड्यांची नोंदणी झाली असून, गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत ही वाढ थक्क करणारी, म्हणजेच चक्क ९४ टक्के नोंदवली गेली आहे.

या विक्रमी उसळीमुळे भारतीय पॅसेंजर कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा एकूण वाटा (Market Share) आता ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, गेल्या महिन्यात रस्त्यावर धावण्यासाठी उतरलेल्या प्रत्येक १२ नवीन कार्सपैकी एक कार ही पूर्णपणे इलेक्ट्रिक होती. भारतीय ग्राहकांची ईव्हीकडे पाहण्याची मानसिकता किती वेगाने बदलत आहे, याचा हा सर्वात मोठा पुरावा ठरला आहे.

महिन्यागणिक वाढतोय आलेख; ६ महिन्यांत २ लाख ई-कार्सची भर

ही वाढ केवळ कागदावर किंवा सणासुदीपुरती मर्यादित राहिलेली नाही. ऑगस्ट महिन्यात देशात ३२,४३३ इलेक्ट्रिक कार्सची नोंदणी झाली होती, तर सप्टेंबरमध्ये त्यात आणखी ११ टक्क्यांची मासिक भर पडली.

चालू आर्थिक वर्षाच्या (FY 2026-27) पहिल्या सहामाहीचा, म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरचा ताळेबंद पाहिला, तर हा आकडा आणखी डोळे दीपवणारा आहे. या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत १,९१,७५१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा १,०१,५४६ इतका होता, म्हणजेच वार्षिक पातळीवर ८९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ग्राहकांमध्ये वाढलेली विश्वासार्हता, चार्जिंगचे विस्तारत असलेले जाळे आणि बाजारात उतरलेले नवनवीन पर्याय यामुळे ईव्हीची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Tata Motors अजूनही Ev मार्केटचा राजा, पण महिंद्राची जोरदार मुसंडी

नेहमीप्रमाणे भारतीय ईव्ही बाजाराचे नेतृत्व टाटा मोटर्स (Tata Motors) कडेच राहिले आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १४,७२२ ई-कार्सची नोंदणी करत टाटाने बाजारातील आपला ४१ टक्के वाटा एकहाती राखला आहे. टियागो, पंच, नेक्सॉन आणि नुकत्याच आलेल्या कर्व्ह ईव्हीच्या जोरावर टाटाने मार्केट मध्ये आपली मजबूत पकड ठेवली आहे.

मात्र या महिन्याची खरी स्टार ठरली ती महिंद्रा (Mahindra)! महिंद्राने दुसऱ्या स्थानावर झेप घेत ७,७४१ ई-कार्सची नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत महिंद्राच्या ईव्ही विक्रीत ११६ टक्क्यांची वाढ झाली असून, बाजारातील त्यांचा वाटा आता २१.५ टक्क्यांवर गेला आहे. महिंद्राच्या नव्या ‘इलेक्ट्रिक ओरिजिन’ प्लॅटफॉर्मवरील BE 6, XEV 9e आणि तीन रांगांची XEV 9S या मॉडेल्सना ग्राहकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, आजच्या घडीला देशातील एकूण ईव्ही बाजारापैकी जवळपास ६३ टक्के वाटा हा एकट्या टाटा आणि महिंद्रा या दोन भारतीय कंपन्यांचा आहे.

MG मोटर, व्हिएतनामची VinFast आणि Kia चीही चमकदार कामगिरी

स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर JSW MG Motor India राहिली असून त्यांनी ५,२२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी केली. १५ टक्क्यांच्या आसपास बाजारातील वाटा राखून एमजीने आपले स्थान कायम ठेवले आहे.

या यादीतील सर्वात मोठी घडामोड म्हणजे व्हिएतनामी ईव्ही दिग्गज व्हिनफास्ट (VinFast) ची झालेली दमदार एन्ट्री. त्यांनी सप्टेंबरमध्ये २,९६१ वाहनांची नोंदणी करत थेट चौथे स्थान पटकावले आणि बाजारात ८.२ टक्क्यांचा मोठा वाटा मिळवला. पाचव्या स्थानावर असलेल्या किआ (Kia) ने १,२५६ गाड्यांच्या नोंदणीसह ११० टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.

सप्टेंबर २०२६: प्रमुख कंपन्यांचा बाजारातील वाटा एका दृष्टीक्षेपात

कंपनीसप्टेंबर २०२६ नोंदणी (युनिट्स)बाजारातील वाटा (Market Share)
Tata Motors१४,७२२४१.०%
Mahindra७,७४१२१.५%
JSW MG Motor५,२२६१४.५%
VinFast२,९६१८.२%
Kia India१,२५६३.५%

हेही वाचा: Mahindra चा Ev बाजारात नवा विक्रम! BE 6 आणि XEV सीरिजने ओलांडला 1 लाखांचा टप्पा; आनंद महिंद्रांनी मानले आभार.

भारतीय ईव्ही बाजारा जोमात!

एकेकाळी महागड्या बॅटरी आणि चार्जिंगच्या भीतीपोटी ईव्हीकडे दुर्लक्ष करणारा भारतीय ग्राहक आता स्वतःहून शोरूममध्ये जाऊन इलेक्ट्रिक गाड्यांचे बुकिंग करत आहे. दरमहा ३५ हजारांहून अधिक नोंदणी आणि अवघ्या सहा महिन्यांत दोन लाखांचा टप्पा गाठणे हे स्पष्ट संकेत देतात की, येणाऱ्या काळात पेट्रोल-डिझेल वाहनांना ईव्हीकडून मिळणारी स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. बजेट हॅचबॅकपासून ते लक्झरी एसयूव्हींपर्यंत सर्व पर्यायांची रेलचेल असल्याने भारतीय ऑटोमोबाइलचे भविष्य आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाले आहे.

(टीप: वरील सर्व आकडेवारी ही अधिकृत ‘वाहन’ (Vahan) पोर्टलवरील प्रत्यक्ष ग्राहक नोंदणीवर आधारित आहे. कंपन्यांनी कारखान्यातून वितरकांना पाठवलेला स्टॉक (Wholesale) आणि आरटीओ नोंदणी यामध्ये थोडाफार फरक असू शकतो.)

Share This Article